उन्हाळा

उन्हाळ्याच्या दिवसात न्हाणी आटोपली की आमची आजी गर्द पेरुच्या सावलीतुन पडणार्या कवडशात उन्हे खात बसे. आराम खुर्चीत एका हातात पुस्तक घेउन डुलक्या मारीत बसलेली आजी आणि तिच्या अवतीभोवती खेळत असलेली आम्ही नातवंड हे द्रुष्य सगळ्यांनाच परीचयाचे असे. कधी कुणी आजीला हलकेच उठवले की तिचे तोंडाला पदर लावुन हसणे ठरलेले असे. जेवणाची वेळ होताच डाळीच्या डब्यात पिकवण्यासाठी ठेवलेले आंबे बाहेर निघत. आम्हा कच्च्या बच्च्यां कडे ते माचवण्याचे काम येई तर कुणीतरी वडीलधारी रस काढण्याचे काम करी. उरलेल्या कोय आणि सालांचे वाटप आजी किंवा आजोबा करीत असे. कोय आणि सालांमधे कुठेही रस उरु नये याची काळजी आम्ही पुरेपुर घेत असु. तो सारा ढीग मग गायीपुढे टाकल्यात जात असे. पंगत सुरु होताच जेवण न करता खिदळत बसण्याचा आणि हात वाळवत बसण्याचा सार्या बच्चा कंपनीचा उद्योग चालत असे. त्यांना जेवायला लावण्याचे आजीला एक मोठेच काम होई. पण आजोबांची एकच हाक ऐकता वेड्यातले वेडे नातवंड मुकाट्याने जेवु लागत आणि पंगत अश्या तर्हेने वेळेवारी उठे. सगळ्यांची जेवणं आटोपताच बाहेर्च्या खोलीच्या साफसफाईचा आणि कुलरमधे पाणी भरण्याचा कार्यक्रम होत असे. कुलरचे पाते अश्या तर्हेनी फिरायचे की एका विशिष्ठ कोपर्यातच वारं लागत असे. त्या कोपर्यात झोपण्यासाठी एकच झुंबड उडत असे. मग रुसवे फुगवे होत दुपारची झोप आटोपायची. चार च्या सुमारास सातुचे पीठ खाण्याचा कार्यक्रम होई. उन्हे उतरताच पाळण्याभोवती मोठ्यांची सभा भरे. गप्पा, थट्टा - मस्करीला उत येत असे. आम्ही आजुबाजुला असल्यास बाबा आणि काका लोक आम्हाला त्यांच्या लहानपणीच्या गमती ऐकवत. आमच्या सुगीच्या दिवसांना तर सुमारच नसे. फिरायला गेलेले आजोबा chocolate च्या पुड्याशिवाय परतत नसत आणि आजी आम्हा नातवंडांना रसवंतीत घेउन जात असे. आमच्यातल्या मोठ्यांपैकी कुणाला तरी गच्चीत पाणी टाकावं लागत असे. रात्रीची जेवणं आटोपली की पत्त्यांचे २ जोड घेउन सत्ती लावणी चा डाव रंगे. ज्यांना खेळायचे नसेल त्यांच्यावर गच्चीत गाद्या घालण्याची जबाबदारी येई. सगळे झोपले की लगेच अंगावर पावसाचे दोन चार थेंब पडले पाहिजे असा जणु नियमच होता। आजोबा आणि बाबा लगेच गाद्या गुंडाळायची घाई करत। पण वाहुन गेलो तरी उठणार नाही अश्या निग्रहानी झोपलेल्या मंडळींची संख्या जास्ती असल्याने त्यांचा निरुपाय होत असे।
अश्या रीतीने उन्हाळ्याची सुट्टी कधी संपायची हे आम्हाला कळतही नसे। आता आजी-आजोबा नाहीत पण त्या आठवणी रसवंतीतील हातमशीनीला लागलेल्या घुंगरांचे आवाज जागे करतात. अजुनही गच्चीवर पाणी टाकतानाचा थंड-गरम अनुभव जसाच्यातसा आठवतो.