न्यू जर्सीत रहुनही गेली चार वर्ष मी एकदाही इंडिया डे परेड ला गेले. मी नट नट्यांना पहाण्यात अजिबात उत्सुक नसल्याने तास-दोन तास ताटकळत उभ रहण आणि कुणाचे तरी ओझरते दर्शन घेउन गर्दीतुन वाट काढत ट्राफिक मधे अडकत कसबस घरी पोहचण माझ्या पचनी पडलं नव्हत. पण यावेळेस मात्र मी नुसतीच परेड पहाण्यासाठी गेले नाही तर परेड मधे भागही घेतला. झाले असे की, नोकरी व्यतिरीक्तही काही काम करावे असे मनात आले. मानवी ही संस्था अमेरीकेतील भारतीय उपखंडातील (मुख्यतः भारत,पकिस्तान व बांग्लादेश) पिडीत बायकांसाठी (Domestic Violence) काम करणारी संस्था आहे. चांगल्या कामाची सुरवात करण्यासाठी मी मानवीला निवडले. आणि एक दिवस मानवी कडुन इंडिया डे परेडचे invitation आले. मीही लगेच हो कळवुन टाकले. आजवर मी कुठल्याही परेडमधे भाग न घेतल्याने मला नक्की काय करायचे तेही माहिती नव्हते.इ-मेल ने कळवलेल्या पत्त्यावर मी बरोबर १:२५ ला पोहचले.पाच मिनिटांनी आणि चार जणी तिथे पोहोचल्या. परेड दीडलाच सुरु होणार होती पण ती भारतीय (भारतीयांनी भारतीयांना दिलेली) वेळ असल्याने अर्धा तास पुढे-मागे होणारच. दहा जणींसाठी तयार केलेले boards आम्ही पाच जणींनी धरले. मग मी शक्कल लढवुन एक board पुढुन आणि दुसरा मागुन दिसेल असे धरले. आमची उभी रहायची जागा दोन अवढव्य ट्र्क्स मधे ठरली. दोन्ही ट्र्क्सवरची पार्टी इतक्या उत्साहात होती की आम्ही चालण्यात दिरंगाई केली तर मागच्या ट्रकच्या लक्षात न येउन तो ट्रक आमच्या अंगावर आणायचा अशी भिती मला चाटुन गेली. दोन्ही ट्रक्स वर कानात दडे बसतील एवढ्या मोठयानी गाणी लागली होती.सोसट्याचा वारा असल्याने आणि अमच्या हातात दोन-दोन boards असल्याने आम्हाला boards घेउन चालणे अवघड झाले. आभाळ तर एवढे भरुन आले होते की कुठल्याही क्षणी आकाश फाटुन मुसळधार पाउस पडण्याची लक्षणं दिसत होती. माझ्या कापडी पर्सचा त्या पावसापुढे काहीही टिकाव लागणार नव्हता. माझ्या नवीन फोनचा मला लवकरच निरोप घ्यावा लागणार हेही उघड पणे दिसत होते. एवढ्यात माझ्या हातातील एका board नी board च्या दांडीशी न पटुन रस्त्यावर उडी मारली. सुरवात तर फारच चांगली झाली!तेवढ्यात दोन जणी आणि पोहोचल्या. त्यांनी बोर्ड कसाबसा पुन्हा चिपकवला आणि आमची दांडी यात्रा पुढे गेली. थोड्या थोड्या करता करता आम्ही आता १२ जणी जमलो. मागचा ट्रकवालाही (स्त्री शक्तीला घाबरुन की काय) बरेच अंतर ठेवुन चालवत होता. आता ट्रकवरची गाणी सुखावह वाटत होती, एक प्रकारचा जोश निर्माण करत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुला तिरंगा घेतलेले लोक उभे होते. लहान-थोर गाण्यांवर ठेका घेत होते. आमच्यात एक साठीच्या आजीही होत्या.मागच्याच वर्षी भारतातुन आल्या होत्या. त्यांच उत्साह ओथंबुन वहात होता. संस्थेची pamphlets वाटण्याचे काम त्यांच्यावर सोपवले होते आणि त्याही अतिशय उत्साहानी पत्रक वाटत होत्या. त्यांची ना वार्याची तक्रार होती ना पावसाची. एव्हाना पावसाने आमची खैर केली होती पण तो आनंद फार वेळ टिकला नाही. पावसाची रिप रिप आता सुरु झाली होती. मी लगेच बरोबर घेतलेली छत्री उघडायचा प्रयत्न केला पण तिलाही तेव्हाच तुटायचे होते!बाहेर काढल्याने ती ओली झाली. म्हणजे तिला आता आत ठेवायची सोय नाही.अश्याप्रकारे आता वार्याचा मारा सहन करत मला बोर्ड आणि छत्री सांभाळणे आले शिवाय पावसात भिजणेही आलेच. पण एवढे होउनही आजींचा उत्साह मावळत नव्हता.थोडे पुढे गेल्यावर आम्हाला बरेच लोक दिसले. आता खरा 'देसी इलाका' सुरु झाला होता. लोक आम्हला पाण्याच्या आणि juice च्या बाटल्या देत होते (वास्तविक आम्ही तीन-चार कि.मी च चाललो असु). माझ्या एका हातात बोर्ड आणि दुसर्या हातात मोडकी छत्री असल्याने कितीही तहान लगली असली तरी पाण्याची बाटली घेणे शक्य नव्हते. काही लोक आम्हाला क़ेळी पण देत होते. ही सगळी तयारी रणरण उन्हात नक्की कामी आली असती. पण पाउस पडला म्हणुन त्याची किंमत कुठेही कमी होत नाही. लोकांचा आणि मुख्यतः आजींचा उत्साह पहुन मग मलाही जोश आला. मागच्या ट्रकवाल्यांसोबत मग मीही 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' चे नारे द्यायला सुरवात केली. माझ पाहुन आजी ही नार्यांमधे सामील झाल्या आणि हळू हळू आमचा पूर्ण ग्रुप नारे द्यायला लागला. आमचे boards वाचुन आम्हाला समर्थन देण्या करता बरेच लोक टाळ्या वाजवु लागले. काही लोक संस्थेचे cards मागु लागले. आमच्यात इतका उत्साह संचारला की आकाश चांगलेच गळू लागले हे देखील आम्हला कळले नाही.अखेरीस परेड संपली.अचानक माझ्या फोनची मल अठवण झाली. फोनला काहीही झाले नव्हते. मधे फोनचा मला विसर पडला हे फारच बरे झाले. कितीतरी वर्षांनी मी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला होता. परेड फक्त नट-नट्यांना पहाण्यासाठी नसते हेही लक्षात आले होते.शिवाय माझ्या आसपास लोक किती विविध प्रकारची काम करतात हेही लक्षात आले. तिथे निर्वासीत कश्मिरींचा ग्रुप आला होता, गुजरात आणि बंगलोर मधील स्फोटात मेलेल्या लोकांसाठी प्रार्थना करणारा ग्रुप आला होता, हिंदी भाषेचा प्रचार करणार ग्रुप आला होता. अश्या अनेक धार्मिक आणि सामजिक संस्थांचे प्रतिनिधी तिथे आले होते. या संस्थांना वहुन घेणारे लोक पहिल्यांदाच मला दिसत होते.
माझी पहिली-वहिली परेड अशी अविस्मर्णीय ठरली!