असंच काहीतरी

काहीतरी लिहावं असं बरेच दिवसांचं वाटता आहे पण वेळच मिळत नव्हता. आज वेळ मिळाला तर डोक्याची पाटी कोरी सापडली. मनाच्या कप्प्यात जरा हात घालून पाहिला तर जड गोष्टी पहिले हाताला लागल्या. मनाची सार्या जगापेक्षा निराळीच रीत असते. जगात जड गोष्टी तळाशी जातात मात्र मनात जड गोष्टी वरच तरंगतात! पण आज हलक्या फुलक्या गोष्टी बोलूया. इतक्यात माझं मन हलकं करणारी एकाच गोष्ट आहे ती म्हणजे माझा पिल्लू! पिल्लू म्हणजे उत्साहाचा आणि प्रसन्नतेचा धबधबा आहे. झोपेतून उठून गळ्यात हात घालून गालावर गाल जेव्हा घासतो तेव्हा वाटता कोणी तोंडात साखरच घातली. डोळे मिटून अंग घासत मनी स्वतःचे लाड करून घेतो तेव्हा खरोखरची माऊ आठवते. 'खाली खाली', 'उतर', 'दुदू' , 'हवाय-हवाय' असं म्हणत पिल्लू ओढत खाली घेऊन जातो. दूध न पिता चूप चा झाकण चावत बसतो. स्वयंपाक घरातून ओढत पायरी जवळ नेऊन म्हणतो 'खुची - बशा बशा'. काम सोडून बसावसं वाटतं पण सकाळच्या धावपळीत बसणं होत नाही.
उठल्या पासून त्याची गाणी सुरु होतात. बरेचदा चालीवर भलतच काही तरी गातो पण चाल मात्र सोडत नाही. 'मैनेचा पिनना वन कानना' हे ऐकल्यावर पटकन उठून मुका घ्यावासा वाटतो. ९-१० महिन्याचा असताना मी त्याला जेव्हा गाणी ऐकवायचे तेव्हा याला काही कळत आहे का? असं वाटायचं. आता कळत आहे की त्याला सगळं कळायचं. मनूचा कौतुक करावं तेवढं थोडं. पठ्ठयाला लगेच गोष्टी पाठ होतात. एक दिवस शशूल-शशूलरे डुलक्या मारी म्हटलं तर दुसऱ्यादिवशी लगेच माझ्यासोबत गाऊ लागला. आजकाल त्याला माझ्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द त्याचं गाणं असावा असं वाटतं. मी दुसरं काही म्हटलं की म्हणतो 'नको'. कधी कधी वाटतं याला नाही म्हणावं मग वाटतं हे दिवस भराभर जातील आणि मला त्याच्या साठी गाणी गावीशी वाटतील तेव्हा त्याला मोठा झाला म्हणून लाज वाटेल. अश्या वेळेस वाटतं मुलगी हवी. मुलींचे लाड त्या कितीही मोठ्या झाल्या तरी करू शकतो. त्यांच्या केसातून त्या १२ वर्षाच्या झाल्यावरही हात फिरवला तरी त्यांना त्यात वावगं वाटणार नाही. मुलं मात्र लगेच नको म्हणतील. 
आमच्या सोनुला नाचायचाही नाद आहे. जरा ठेका ऐकला की स्वारी डोलायला लागते. लग्नात सोनू इतका नाचला की आता हा पाया दुखतो म्हणून झोपेत रडेल की काय अशी भीती मला वाटली. वरातीच्या band वरती band वाल्याच्या अगदी जवळ जाऊन नाचला. सगळे त्याच्याकडे कौतुकानी पहात होते. घरी मी कुटला गाणं  म्हणत डोलले की हा उठून नाचायला तयार असतो!
पिल्लू अगदी लाडोबा झाला आहे. त्याला वाटतं सगळी नावं त्याचीच आहेत. आई-बाबा फक्त त्याच्याच बद्दल बोलतात. त्याला म्हटलं 'कुंदा कोण?' तर स्वतःकडे बोट दाखवतो. बंडू, चंपा, सुगंध, छकुल या सगळ्या नावांना स्वतः कडे बोट दाखवतो. मग आम्ही आमची नावं घेतली तरी तो स्वतः कडेच बोट दाखवतो!
आमचा बाबी एक नंबर बडबड्या आहे. डोळ्यापुढे जे येईल ते बोललंच पाहिजे. कार मधून जाताना ट्रक किव्वा व्हान दिसली कि ओरडतो 'ती बग ट्रक'. सूर्य डोळ्यावर आला कि म्हणतो 'सन आली'. सूर्य झाडा मागे गेला कि म्हणतो 'सन लपली'. बऱ्याच गोष्टींना काहीच्या काही म्हणतो. चष्मा त्याच्या साठी 'चीमता' असतो आणि बाप्पा 'जीबाप्पा'. बऱ्याच गोष्टी काय बोलतो ते अजिबातच कळत नाही. काही गोष्टी शिकवताना पंचाईत होते. जसा काऊ म्हणजे कावळा आणि गाय. मग कावळा म्हणताना 'काव -काव काऊ' म्हणायचे. सिंह त्याच्यासाठी 'शिन्न' असतो पण आता हळू हळू त्याचा लायन होतो आहे. पुढे किती बदल होतील कोणास ठाऊक. बोलला नाही तरी मराठी कळावी असं वाटत रहात.
कधी वाटतं या सगळ्यातून आपल्याला वेळच मिळत नाही. मग वाटतं बघता बघता हा मोठा होईल आणि इतका वेळ मिळेल कि त्याचं काय करावं कळणार नाही.
छकुल असाच आनंदात राहावा. पहिल्या वर्षभरात त्याच्या तब्बेतीला झालेला त्रास पुन्हा आयुष्यात त्याला होऊ नये हीच देवाकडे प्रार्थना!