लहानपणी या वाक्याची आम्हाला फारच गंमत वाटायची. या वाक्याला उलटे वाचले तरी तेच वाक्य बनते. शिवाय कॉलनी मधे चीमा बोरगावकरला चिडवायलाही हे वाक्य वापरले जायचे. चीमाचे खरे नाव मला आजही माहिती नाही.बिचारी चीमा!पण हल्ली मला चीमा असल्या सारखे वाटायला लागले आहे।
मागच्या वर्षी मी जेव्हा भारतात गेले तेव्हा मला अमुलाग्र बदल दिसला. माझे जे तिथले अनुभव आहेत ते इथल्या ओळखीतल्या जवळ-जवळ सगळ्यांनीच अनुभवले. पण बर्याच जणांना या बदलाची जी खंत वाटली ती मला वाटली नाही. बदल हे प्रगती चे लक्शण आहे आणि तुम्हला आम्हाला गोष्टी कितीही बदलू नये वाटलं तरी त्या बदलतीलच. मला आनंद आहे की हा बदल आपल्या देशाच्या बाब्तीत चांगल्या दिशेनी घडतो आहे. शिवाय जोवर आपलं घरटं जस उबदार होतं तसंच ते परतल्यावरही असलं तर जग बदलले तरी काय फरक पडतो !या झपाट्यानी बदलणार्या परिस्तिथीच आपण भाग नाही ही खंत कधी उरतच नाही. जर कधीही या घरट्याची आठवण येउन मन उदास होते तेव्हा विचार येतो की आपण आणि मुंबई/पुणे, बंगलोर, दिल्ली या सारख्या ठिकाणी काम करणार्या लोकांची परिस्थिती आपल्यापेक्शा काय वेगळी! ते तरी कुठे उठसुठ आपल्या गावी जाऊ शकतात? आणि माझ्या काही मैत्रिणी खरच वर्षा दीड वर्षांनी माहेरी जातात. मग त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक? पण फरक आहे!वेळ प्रसंगी त्या मदतीला जाऊ शकतात. दोन दिवस/ पंधरा दिवस राहू शकतात. मी नाही जाऊ शकत. मागच्या वर्षी चे उदाहरण मला चांगलेच आठवते. माझ्या नवर्याला त्याच्या मावशीची तब्बेत वाईट असल्या बद्दल कळले. त्यानी लगेच जायचा विचार केला. पण त्याला विसा renew केल्या शिवाय देश सोडता आला नाही. सुदैवानी मावशींची अजुनही भेट होते. पण अश्या वेळेस इथे असण्यातला आणि तिथे असण्यातला फरक कळतो आणि विचार येतो आपण काय कामाचे!घरच्यांना ही परिस्थिती आधीच माहिती असते. घरच्या चिंतापासुन ते आपल्याल दुर ठेवु लागतात. चिंता सांगुन उपयोग तरी काय? एवढ्या दुरुन करु तरी काय शकणार?लहानपणी घरी बरेच कठीण प्रसंग आले. कधी चिमुकल्या मनाला प्रसंगाचे गांभीर्य कळले कधी सगळ्यांचे चेहरे पाहुन वेडेवाकडे वागू नये एवढेच लक्शात आले. मोठे झाल्यावर कधी मदत करता आली तर कधी कधी घरच्यांची तकतक नुसतीच दुरुन पाहिली. जाणते अजाणतेपणे या प्रसंगांनी बरेच काही शिकवले. त्या क्शणांचा मी भाग होते हा विचार निराळे समाधान देऊन जातो. पण आज या हजारो मैलांच्या अंतरानी ते क्शण माझ्यापसुन साता समुद्रा पलिकडे नेले. मला कळेपर्यंत घरातील वादळ शमलेले असते. पण त्या वादळातुन माझे लोक कसे गेले असतील, त्यांना कोणी मदत केली असेल, त्यांच्यावर कसे प्रसंग आले असतील हे विचार आल्या शिवाय रहात नाही. आणि शेवटी विचार येतो घरची चीमा घरटे सोडुन दुर निघुन गेली.आता चीमा काय कामाची?