भारताचा वाली कोण?

गेल्या २ वर्षात भारतात विक्रमी संख्येनी घोटाळे उघडकीला आले. काही घोटाळे उघडकीला येण्यामागचे कारण म्हणजे विविध पक्षांमधील नेत्यांमधे चाललेली आपापसातली चाललेली लाथाळी तसेच दोन पक्षांमधे चालले राजकारण हे आहे.  तर उरलेल्या घोटाळे उघडकीस येण्याचे कारण त्या घोटाळ्यामधे न झाकता येणारा भ्रष्टाचार आहे. हे घोटाळे आधी होत नव्हते असे नाही पण आज एवढा वारेमाप पैसा या आधी भारतात नव्हता. पण त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे आज इतके बातम्यांच्या चॅनल्सचे पीक आधी आलेले नव्हते. एखाद्या गायीला चार पायांऐवजी पाच पाय आहेत हे २४ तास चालणार्‍या बातम्यांच्या चॅनल्सवर दिवसातून कमीतकमी दोनदा दाखवले जात असेल तर घोटाळ्याबद्दल हे लोक दिवसातून कितीवेळेला दाखवत असतील याची कल्पनाच केलेली बरी! या सततच्या बातम्यांचे टोले हाणल्यावर शहाण्या माणसाच्या डोक्याला पोचे पडणारच. शिवाय आज नोकरी-कामा निमित्त परदेशात (पाश्चिमात्य देशात) जाणार्‍या लोकांची संख्या अगदी पाच ते दहा वर्षांच्यामानानी दुपटीनी वाढली आहे. नागपूर, कोल्हापूर, सातारा इत्यादी लहान शहरातल्या लोकांना सुद्धा भ्रष्टाचाराशिवाय आयुष्य किती सुकर होऊ शकते याची जाणीव झाली आहे. त्यांचे हक्क काय आहेत आणि ते राजकारण्यांनी आजवर कसे हीरावले याची कल्पना भारतात बहुतांश लोकांना झाली आहे. राजकारण्यांना सुद्धा याची जाणीव नक्कीच झालेली आहे. म्हणुनच एकमेकांच्या उरावर बसून दुसरा कसा आणि किती वाईट हे दाखवण्याचाच खटाटोप सतत होताना दिसतोय. घोटाळे उघडकीला येणे ही गोष्ट जरी चांगली असली तरी नेत्यांची एकमेकांच्या उरावर बसण्याची वृत्ती अत्यंत चिंताजनक आहे. सगळ्यांचा focus जर एकमेकांचे पितळ उघडे पाडणे एवढाच असला तर देशासाठी काम कोण करणार? आज माझ्या उरावर कोण बसणार हा विचार करण्यातच आपल्या नेत्यांनी वेळ घालवला तर महत्वाचे निर्णय सारासार विचार करून घेणार कोण? आज या पदावरून हा उडाला उद्या तो उडण्याचे चिन्ह आहेत असेच चित्र राहीले तर पुढे जाण्यासाठी हालचाल करण्याच्या ऐवजी जो तो पद आहे तोवर उपभोगायच्या मागे असणार. माझ्यानंतर आलेला घेत बसेल निर्णय मी जैसे थे चालू ठेवणार हीच वृत्ती सगळी कडे फोफावणार. सध्या काही वेगळे दिसते आहे अश्यातला भाग नाही. ऐन मंदीचे सावट डोक्यावर असताना आपले अर्थमंत्री आपल्या ग्रुहमंत्र्यांचे वाभाडे काढ्ण्यात मग्न आहेत. बर ते तरी छातीठोकपणे करावं ना. आता म्हणतात हे माझे विधान नाहीत.

ग्रुहमंत्र्यांनी सुद्धा यंत्रणेत बदल घडवून आणण्याचे निर्णय घेतलेले दिसत नाही. त्यांचे सारे लक्ष हातातुन निघुन गेलेल्या अर्थमंत्रालयाकडेच असल्याचे दिसून येते. या दोन मंत्र्यांची लाथाळी कमी की काय असे वाटून मधेच दिग्विजयसिंग यांचा धिंगाणा सुरू असतो. सध्या कुठलेही काम नसलेल्या, थोड्क्या आणि समर्पक शब्दात मांडायचे झाल्यास रिकामचोट असलेल्या, दिग्विजयसिंगांना लाळघोटुपणा करून पुढल्या सरकारात कुठले तरी मंत्रीपद मिळण्याची आस लागून आहे. काही वर्षांपूर्वी अजित जोगींचे असेच प्रयत्न फळास आले होते.
बर आत्ताचा गदारोळ कधीतरी आटोक्यात येऊन पुढच्या निवडणुकीत या सरकारला धडा शिकवण्याच्या आशेत बसलेल्या लोकांपुढे फारसे  options आहेत असे मूळीच नाही. आणि खरी चिंता तीच आहे.
कोंग्रेस ला पर्याय भाजपा एवढाच आहे. भाजपाची परिस्थिती कोंग्रेसपेक्षा दयनीय आहे. एवढ्या घोटाळ्यांमधेदेखील ती लोकांची सहानुभूती कमवण्यास असमर्थ ठरली असेच चित्र दिसते आहे. राजनाथ सिंग व नितीन गडकरी यांसारखे पक्षप्रमुख निवडुन तिला नेत्यांची किती भीक लागली आहे एवढेच दिसते. जिभेचा पट्टासोडुन बोलण्यात भाजपा मधील कोणीही मागे नसल तरी गडकरींचा हात धरणारा विरळाच! त्यांच्यात आणि लालू मधील शाब्दीक चकमाकीचे प्रसारण करण्यास एखाद्या वाहिनीला हक्क मिळाले तर त्या वाहिनीचे TRP एकारात्रीत दुपटीनी काय दसपटीनी वाढेल!
यशवंत सिन्हा व जसवंत सिंग यांचे उर्वरीत पक्ष नेत्यांशी वाकडे असल्याचे न ते लपवत न उर्वरीत पक्ष नेते लपवत. अडवाणींच्या कुरबुरी व पंतप्राधान बनायची महत्वाकांक्षा मधुन मधुन डोक काढतच असतात. काही वेळेस तर ते desparate झाल्याची लक्षणे त्यांच्या जिना विधाना वरुन, त्यांच्या इख्तार पार्टीला जाण्यावरुन व भ्रष्टाचार रथयात्रे वरून उघड होतात.
आजकाल नरेंद्र मोदी सुद्धा असेच दिशाहीन झाल्याचे दिसून येते. त्यांचा ३ दिवसांचा सद्भावना उपास त्यांना पंतप्राधानपदाची स्वप्ने पडायला लागण्याचे द्योतकच आहे!
एकंदर काय तर भाजपच्या कुठल्याही नेत्यासमोर भारताच्या भविष्याचे स्पष्ट चित्र असावे असा विश्वास ती लोकांमध्ये निर्माण करत नाही. शिवाय पंतप्रधान पदासाठी उमेदवार निवडण्यात पक्षामधेच एकजूट दिसत नाही. जोवर पक्ष एकजूट होत नाही तोवर कोंग्रेसी नेते कितीही चिखलात लोळले तरी त्याचा फायदा भाजपला होणे अशक्य आहे.
कोंग्रेसची अवस्था कोणापसुनच लपालेली नाही. त्यातल्या एकलाही देशाचे सोयर सुतक नाही. राहुल गांधीने पंतप्रधान बनणे ही कल्पनाच अंगावर शहारा आणते. दुःखात सुख एवढेच की सारेजण एकाच दिशेकडे पाहून बांग देतात.
अश्यावेळेस अंदाज येतो की १९व्या शतकात इंग्रजांना एवढ्या मोठया आणि दिगज्जांनी भरलेल्या भारतावर इतका सहज कब्जा कसा मिळवला!

No comments: