गुलाबी थंडीच्या पांढार्या छटा

आज काय लिहावे सुचत नाही आहे. खूप खूप दिवस झाले काही लिहिले नाही. सध्या मौसम पण असा आहे की काहीच करवेसे वाटत नाही. थोडक्यात काय तर पाया पासून डोक्यापर्यंत आळस भरला आहे अंगात!
मला आठवत आहे, असे थन्डीचे दिवस असले की आई अंगात २ स्वेटर, कानात स्कार्फ आणि मफ्लर, पायात मोजे, अंगावर दोन पातळ चादरी, दोन ब्लॅंकेट्स आणि एक दुलई एवढे घेऊन झोपायची. एवढा पसारा तिला अंगावर ओढता येत नसल्याने ती आम्हाला चादरी, ब्लॅंकेट्स आणि दुलई अंगावर टाकून मागायची. आईची ही गंमत सगळ्यांना माहिती होती. थंडी सुरू झाली की आत्या, ताई, दादा सगळे चेष्टेने आई ला विचारायचे, 'ब्लॅंकेट्स, दुलया निघाल्या का?' आई पण मिस्कील हसत त्यांना उत्तर द्यायची.
इथे हिटर्स मुळे थंडी तेवढी जाणवत नाही पण बाहेर जायला लागल की वाट लागते. अश्या थंडीमधे गाडी बंद पडली तर देवच आठवतात. शिवाय बर्फ पडला असेल तर ज्या गाड्यान्ची टायर्स जुनी झाली आहेत किव्वा ज्या गाड्यान्चे ब्रेक्स चांगले नाही (दोन्ही मधे माझी गाडी येते) अश्यांचे हमखास आक्सिडेंट्स होतात (माझा इतक्यात झालेला आक्सिडेंट बर्फामुळे नव्हता). आक्सिडेंट मधे फसलेल्या लोकांची कीव यायच्या ऐवजी ऑफीस ला येताना किव्वा जाताना उशीर झाला म्हणून 'आताच धडपडायच होत!' अश्या अर्थाचे कटाक्ष दिल्या जातात. त्याशिवाय ऑफीस च्या वाटेवरून जाणार्या मोठ्मोठ्या कंटेनर्स च्या डोक्यावरचा साचलेला बर्फ नेमक आपण ओवर्टेक करत असतानाच आपल्या समोर धडामढुडुमपडल्याने जो चित्तथरारक अनुभव येतो तो निराळाच!
बर्फामधे चालत असताना कंप्यूटर माइन स्वीपर नावाचा गेम खेळल्यासारखे वाटते. गेम मधे कुठल्या टाइल खाली बॉम्ब सापडून धारतीर्थी पडू याची जशी खात्री नसते तशीच कुठल्या क्षणी बर्फावरुन निसटून हाड मोडून घेऊ याचीही खात्री नसते! दर हिवाळ्यात ऑफिस मधे, मॉल मधे नाही तर कुठे ना कुठे प्लास्टर मधे हात-पाय असलेले बर्फामुळे घायाळ झालेले लोक नक्कीच दिसतात.
इथे बर्फामुळे वेड लागणार्यांची संख्या काही कमी नाही. एखादे वर्षी बर्फ कमी झाला तर मनापासून हलहळणारे लोक इथे सापडतात. २ वर्षा आधी कोणी बर्फाच्या सौंदर्याचे वर्णन माझ्या पुढे केले असते तर मी पोट धरून हसले असते. पण मागच्या वार्षीच्या अनुभवाने माझे मत बदलले (एवढेही नाही की बर्फा ना झाल्याने मी हळ्हळीन पण बर्फ झाला म्हणून मला जे रडु यायचे ते आता येणार नाही). मागच्या वर्षी एका रात्रीत एवढा बर्फ झाला की गुडघयापर्यंतच्या उंचीची प्रत्येक वस्तू बर्फात झाकाल्या गेली. रस्त्यांवर त्या आधीच मीठ घालून ठेवल्याने आणि लागोलाग रात्रभारातूनच तो बर्फ रस्त्यावरून सॉफ केल्याने मला कामावर जावेच लागले. बाहेरचा बर्फ पाहून माझ्या अंगावर शहारा आला होता. जड पायानी आणि त्याहून जड अंत:करणानी मी गाडी काढून बाहेर पडले. बाहेर सगळीकडे पांढरी स्वच्छ चादर टाकल्या सारखे दिसत होते. बर्फाचा एक वेगळाच उजेड पडला होता. नीट पहिल्यावरच दिसतील अश्या प्रकारे चिमण्या खेटुन बसल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा पांढर्या पेन्ढ्या टाकल्या सारख्या वाटत होत्या. वाटेत लागणारे गोल्फ कोर्स बर्फाने झाकाल्या गेले होते. इतर दिवशी ते विस्तीर्ण मैदान सुरेख त्याच्या नीटनेटक्या गवतामुळे, होल्स मधे लावलेल्या झेन्ड्यान्मुळे, मधेच असलेल्या वाळूच्या पॅचस मुळे सुंदर दिसते पण त्या दिवशी तिथे ना गावात दिसत होत, ना वाळू आणि नाही झेंडे पण त्या दिवशीचे त्याचे सौन्दर्य अवर्णनीय होते.
 दिवस काही औरच होता. सगळी कडे निरव शांतता होती (ऑफीस ला जाताना हा अनुभव येणे खरच दुर्मिळ!) साफ केलेल्या रस्त्यावरही मीठ टाकल्याने पांढरा थर साचला होता. ट्रॅफिक सिग्नल सुध्दा बर्फानी झाकाल्या गेले होते. त्यातले दिवे तेवढे लुकलुकत होते. त्यांच्या कडे पाहून मला आईची आठवण आली. २ स्कार्फ आणि अंगावरचे अवजड पांघरूण यात आईचा फक्त चेहरा जसा दिसतो तसे त्या सिग्नल चे झाले होते. जणू त्यानी पांढार्या स्कार्फ आणि पांढर्या पान्घरुणानी स्वत:ला झाकून घेतले होते. ऑफीस मधे पोहोचल्यावर मला फार च्ण वाटले. त्या दिवशी मला एक बाई म्हणाली, 'बाहेर किती सुंदर आहे सगळ!'. मी पण हसून, मनापासून 'हो' म्हटले.

No comments: